Saturday, September 2, 2017

(विभूतिवैभव, अंक ९५)



विदर्भातील वीरशैव संप्रदाय

पार्श्‍वभूमी व स्वरूप


डॉ० अशोक गंगाधर मेनकुदळे

एम्०ए०, पीएच्०डी०



महाराष्ट्राचा सांस्कृतिक गाभारा धर्मपंथांच्या नंदादीपांनी उजळविलेला आहे. त्यात जैन, बौद्ध, नाथ, महानुभाव, वारकरी आणि वीरशैव हे धर्मसंप्रदाय प्रमुख आहेत. प्राचीन व मध्ययुगीन मराठी साहित्य हे तत्कालीन धर्मपंथांच्या तत्त्वज्ञान व आचारविचारांच्या अभिव्यक्तीचे माध्यम बनलेले आढळते.

विविध राजवंश आणि वीरशैव
मध्ययुगातील दक्षिणेतील राजवंश म्हणजे राष्ट्रकूट, चालुक्य, वरंगळचे काकतीय नृपती, द्वारसमुद्रचे होयसळ, कोल्हापूरचे शिलाहार, गोव्याचे कदंब, चोळ, पांड्य, मंगळवेढ्याचे कळचुर्य, यादव, विजयनगरचे राज्य आणि बहामनी सुलतानांच्या राजवटी यांच्या राज्यांत इष्टलिंगपूजक वीरशैव धर्माचे लोकसमूह वास्तव्य करून होते.

कर्नाटक, महाराष्ट्र हे भाषाप्रदेशसूचक शब्द बहामनी राजवटीपर्यंतच्या काळासाठी वापरणे इतिहासाला धरून न्यायाचे होणार नाही. त्याऐवजी दक्खन, दक्षिणा पथ वा दक्षिण हे शब्द अधिक योग्य आहेत. वरील राजवटींच्या राज्यांतील प्रजा ही निर्भेळ एकाच भाषेची नव्हती. कन्नड, मराठी, तेलुगू अशी संमिश्र भाषक होती, हे ऐतिहासिक सत्य दुर्लक्षून चालणार नाही. (उदा०- दामाजी पंत किंवा कान्होपात्र राहात असलेले मंगळवेढा हे बिदरच्या बुरीदशाहीत होते. आजचा मराठवाडा तेलुगूबहुल हैदराबाद निजामी राज्याचा भाग होता.)
मध्ययुगीन राजघराण्यांच्या धार्मिक भाषिक धोरणाचा प्रभाव तत्कालीन प्रजेवर पडत असतो हे गतेतिहासावरून आपल्याला माहीत आहेच. राजा अनुकूल असेल तर विशिष्ट धर्मपंथ बहरतो-फुलतो, प्रतिकूल असेल तर कोमेजतो, खुरटतो, वाळतोसुद्धा. वरील राजवंशांपैकी राष्टकूट, चालुक्य, होयसळ, शिलाहार, कळचुर्य, यादव व विजयनगरचे राज्यकर्ते हे कन्नडभाषक होते. त्यामुळे वीरशैव धर्माची चळवळ फुलण्यास मदत झाली.

दक्खनमधील वीरशैव लोकसंस्कृती
दक्खनमधील वीरशैवधर्मीय लोकांची जीवनपद्धती व संस्कारव्यवस्था सामान्यत: सारखीच आढळते. फक्त फरक आढळतो तो कन्नड, तेलगू, मराठी भाषेचा. सर्वसाधारण आचारपद्धतीत कपाळावर विभूतीचे त्रिपुंड्र, गर्भाधान संस्कार, चोरचोळी, सटवीची पूजा, पाळण्यात घालून नामकरण, इष्टलिंग-दीक्षाविधी, गुरूची पादपूजा, अंगावर इष्टलिंगधारणा, ऋतुमती शुद्धिसंस्कार, लग्नकार्ये, गुग्गूळ विधी, खापरी किंवा वीरभद्राची पूजा, त्यासाठी म्हटली जाणारी पारंपरिक गाणी (वडप), मांडली जाणारी ‘गादी’, पंचकलश, गृहप्रवेश, शवासाठीचे विशिष्ट आसन (माड, डोली, विमान), शिवैक्य/लिंगैक्य समाधिसंस्कार, जेवण्यापूर्वीची इष्टलिंगपूजा-भस्मविलेपन इ० लोकसंस्कृतीतील धारणा, संकेत व संस्कार संपूर्ण दक्षिणेत सर्वत्र कमीअधिक फरकाने सारखेच आढळते. वीरशैवांची श्रद्धास्थाने दक्षिणेत सर्वाधिक आहेत. उदा०-

१. श्री १००८ जगद्गुरू वीरसिंहासन, रंभापुरी पीठ, बाळेहोन्नूर,  कर्नाटक

२. श्री १००८ जगद्गुरू सद्धर्मसिंहासन उज्जयिनी, जि० बेळ्ळारी, कर्नाटक 

३. श्री १००८ जगद्गुरू सूर्यसिंहासन, श्रीशैलम्, ता० आत्मकूर, जि० कर्नूल, आंध्रप्रदेश

याशिवाय म० बसवेश्‍वरांचे जन्मस्थळ बागेवाडी, ऐक्यस्थळ कूडलसंगम (बागलकोट), अनुभवमंटप (बसवकल्याण, बिदर), सिद्धरामेश्‍वर (सोलापूर), गावोगावी असलेली म० बसवेश्‍वरांची मंदिरे-पुतळे, चन्नबसवेश्‍वर, अक्कनागम्मा, दानम्मा देवी (सांगली), अक्कमहादेवी, अल्लमप्रभू, कक्कय्या-हरळय्या इ० वीरशैव संतांची क्षेत्रे, शांतलिंग-मन्मथस्वामींची श्रीक्षेत्रे, गावोगावीचे पूजनीय गुरू, स्वामी, मठाधीश, त्यांच्या मठसंस्था इ० स्थाने वीरशैवांची श्रद्धास्थाने आहेत. या क्षेत्राबाहेरची श्रद्धास्थाने म्हणजे श्री १००८ जगद्गुरू ज्ञानसिंहासन, काशीपीठ. सध्या असलेले जगद्गुरू डॉ० चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, काशी (उत्तरप्रदेश) आणि श्री १००८ जगद्गुरू एकोरामाराध्य, वैराग्यसिंहासन, केदारपीठ. सध्या असलेले जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, ऊखीमठ, जि० चमोली (उत्तरांचल) ही आहेत.

दक्खन : भाषा भिन्न : संस्कृती एक
दक्षिणेतील वीरशैव स्त्री-पुरुषांच्या लोकाचारात- गळ्यात इष्टलिंग परिधान करणे, कपाळावर विभूतीचे त्रिपुं लावणे, मुलामुलींची नावे कटाक्षाने ‘शिव’संस्कृतीतील ठेवण्यात समाधान मानणे, स्त्रियांच्या नावामागे ‘अम्मा’, ‘अव्वा’, ‘आक्का’ आणि पुरुषांच्या नावाअंती (पदांती) ‘अय्या’, ‘अण्णा’, ‘देव’ किंवा ‘आप्पा’ लावण्यात भूषण वाटणे, राहात्या गावाच्या नावावरून आडनावे लावणे- ही दक्षिणी पद्धतच आहे. कितीतरी ‘ईकारान्त’ कन्नड आडनावे मराठीत ‘एकारान्त’ झालेली आढळतात. दोन लिंगायत व्यक्ती परस्परांना भेटल्यावर ‘शिवशरणार्थ’ म्हणतात. हे सर्व दक्षिणी वीरशैव संस्कृतीचे अवशेष आहेत. वीरशैव-लिंगायत संस्कृृतीची नाळ अशा रीतीने दक्खनी संस्कृतीशी अधिक जुळलेली आहे. दुर्गाबाई भागवत म्हणतात, ‘आंध्र-कर्नाटक-महाराष्ट्र यांचे साहित्य भिन्न भाषिय असले तरी भिन्न संस्कृतीचे नाही. भाषा भिन्न तरी संस्कृती एक आहे’, या म्हणण्यात खूप सत्यांश आहे (तोरो २००१, ७१).

भाषा : संस्कृतिप्रसाराचे माध्यम
ध्वनीच्या लाटा पसरण्यास ‘हवा’ या माध्यमाची गरज असते, तसाच भाषिक व्यवहार सुलभ होण्यासाठी तीच भाषा बोलली जाणे आवश्यक असते. सांस्कृतिक घटनाप्रसाराची तीव्रता व वेग हे माध्यमाच्या प्रभावीपणावर अवलंबून असते. कल्याण येथील अनुभवमंटपातील विचारमंथन, जातिनिर्मूलनाची चळवळ, इष्टलिंगभक्ती, वीरशैव तत्त्वज्ञान स्थानिकांच्या कन्नड लोकभाषेतून सांगितल्या गेले. कानडी वचनातील जीवनगाणी, अमृतवाणी कल्याणच्या दक्षिणेकडील कन्नड प्रदेशात कन्नडच्या माध्यमातून तीव्र वेगाने फैलावली. कारण घटनेचे व प्रसाराचे माध्यम एकच होते- ‘कन्नड!’ याउलट कल्याणच्या उत्तरेकडील सुमारे २०० कि०मी०चा प्रदेश कन्नड-मराठी संमिश्र भाषक असल्यामुळे इष्टलिंग-भक्तिप्रसाराची तीव्रता सौम्य झाली. मराठी माध्यमातून कन्नडमधील वीरशैव चळवळ, क्रांतिकार्ये, तत्त्वज्ञान, आधार पसरण्यास मराठीचे माध्यम अडसर बनले. याउलट सहा-सातशे कि०मी० दूर दक्षिणेकडे द्राविड भाषाभगिनीमुळे वीरशैव चळवळ वेगाने फैलावू शकली.

कन्नड राजघराण्यांचे कृपाछत्र हरविल्यामुळे संभ्रमित वीरशैव
राष्ट्रकूटांचे राज्य चालुक्यांनी गिळंकृत केले. चालुक्यांचे राज्य यादवांनी ११९० मध्ये बळकाविले. अल्लाउद्दीन खिलजीने १२९६ मध्ये देवगिरीच्या यादवांना प्रथम मांडलिक करून १३१८ मध्ये संपूर्ण राज्य बळकाविले. द्वारसमुद्राच्या होयसळांचे राज्य १३२७ ला मुबारक खिलजीने संपविले. दिल्लीची राजधानी महंमद तुघलकाने१३२७ मध्ये देवगिरीला आणली. थोड्याच दिवसांत बहामनी सुलतानांचे आपापसात न पटल्यामुळे त्यांच्यात सुंदोपसुंदी होऊन त्यातून दक्षिणेत पाच इस्लामी राज्यांची निर्मिती झाली. नगरची निजामशाही, बिदरची बुरीदशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि वर्‍हाडची इमादशाही. ही राज्ये निर्भेळ एका भाषेची नव्हती. संपूर्ण दक्खनमध्ये विखुरलेली प्रजा या सुलतानांच्या वरवंट्याखाली आली. देशी राज्ये व त्यांचे सर्व महामंडलेश्‍वर-मांडलिक निष्प्रभ झाले. स्वाभाविकच वीरशैवांतर असलेले कन्नड राज्यकर्त्यांचे सहृदय कृपाछत्र, मेहेरनजर सुलतानांनी राज्यलक्ष्मी हिरावल्यामुळे कन्नडभाषक लिंगायत सैरभैर होऊन अगतिक झाले. असुरक्षित अवस्थेत स्वराज्य गेल्यामुळे पारतंत्र्यात दिवस काढू लागले.
तेराव्या शतकापर्यंतची दक्खनमधील राजघराणी कन्नडभाषक, शिवाय कन्नडविषयी आस्था असणारी होती. त्यांच्या राजधान्या हळ्ळेबीड, लट्टनुरू (लातूर) मान्यखेट, वातापी (बदामी), विजयनगर, देवगिरी, मंगळवेढा या सर्व कन्नड क्षेत्रात होत्या. अधिकांश वीरशैवांची तेराव्या ते पंधराव्या शतकापर्यंतची लोकभाषा सामान्यत: कन्नड होती. केवळ वरंगळ (हैदराबाद) राज्य तेलुगूभाषक होते. त्यामुळे पंधराव्या शतकापर्यंतच्या, दक्षिण महाराष्ट्रातील वीरशैवांना मराठीतील वीरशैव ग्रंथांची मुळीच आवश्यकता वाटली नाही. म्हणून तत्कालीन जंगम, गुरू, स्वामी, मठाधीश-पीठाधीश व ग्रंथकार यांनी मराठीतून लेखन केलेले आढळत नाही.
अपवाद आहे तो एकमेव विसोबा खेचरांच्या ‘शडूस्छळि’ या ग्रंथाचा. एक तर विसोबा खेचर हे वीरशैव नाहीत. त्यांना वीरशैवांचा षट्स्थलसिद्धान्त आवडला असेल म्हणून ‘स्वान्त:सुखाय’ त्यांनी मराठीत लेखन केलेले असेल. अल्प प्रमाणात मराठी भाषा वीरशैवांत बोलली जात असेलही. तरीही दखल घेण्याजोगी वीरशैव मराठी ग्रंथरचना या काळात आढळत नाही. दक्षिण महाराष्ट्राचा फार मोठा भाग हा वर्षाछायेच्या प्रदेशात येत असल्यामुळे सततचा दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असायचा. (१३९६ साली पडलेला दुष्काळ पुढे सतत १२ वर्षे पडत राहिला. या काळात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याच्या इतिहासात नोंदी आहेत (देशपांडे १९७३, ११४).  राज्यकर्त्या सुलतानांनी सूफीच्या साहाय्याने इस्लामाचा धर्मप्रसार वेगात सुरू केलेला होता. साथीला साथीचे रोग, देवीचा मरीआईचा कोप.

त्यामुळे केवळ आवश्यक त्या शारीरिक गरजा भागविण्यातच आयुष्यातील काळ जात होता. याशिवाय सततच्या राजकीय अस्थैर्यामुळे वीरशैव लोक सुरक्षिततेच्या शोधात धडपडत होते. त्यांची बुद्धी-शक्ती अस्मानी-सुलतानी आघातांशी झुंजण्यात व सुस्थापित होण्यातच खर्च होत होती. स्त्रिया शंभर टक्के तर पुरुष नव्वद टक्के निरक्षर होते. मुद्रणयंत्रे नव्हती. हस्तलिखितांच्या नकला करणे मोठ्या कष्टाचे काम होते. संपूर्ण समाज उदासीन व शासनसत्ता हृदयशून्य असा सगळा आनंदीआनंद होता. तात्पर्य, इसवी सनाच्या तेरा, चौदा व पंधराव्या शतकांतील अस्मानी-सुलतानीमुळे आणि वीरशैव समाजाच्या खचलेल्या शारीरिक-मानसिक अवस्थेमुळे, औदासिन्यामुळेच वीरशैव मराठी साहित्यक्षेत्रात शुकशुकाट आढळतो. वीरशैव मठांतील सारेच ज्ञानदीप विझलेले होते. गणाचारी वृत्ती नष्ट होऊन परिस्थितीशरणता वाढलेली होती.

स्वधर्मरक्षणाची धडपड
मोगल व बहामनी सुलतानांच्या बादशाही तख्ताच्या आश्रयाखाली आलेल्या हजारो सूफी धर्मप्रचारकांनी दक्खनमध्ये इस्लामचा प्रचार-प्रसार जल्लोशात व धुमधडाक्यात सुरू केलेला होता. अशा तुफानी वादळवार्‍यात वीरशैवांची आचारवैशिष्ट्ये शाबूत ठेवण्याचे असिधाराव्रत आपापल्या बुद्धिचातुर्यक्षमतेनुसार लोकांनी चालविले. महापुरात न वाकणारी झाडे वाहून जातात, परंतु वाकणारी लव्हाळी मात्र जिवंत राहतात. सर्वच धर्मपंथांनी अशा लव्हाळी वृत्तीने स्वधर्माचे रक्षण केले, हे इतिहासावरून लक्षात येते.

गावांची नावे सुलतानांच्या संस्कृतीला साजेशी बदलल्या गेली. धर्म न बदलविता काहींनी स्वत:च्या आडनावातही खुबीने बदल करवून कुर्निसात केला जाऊ लागला. आपल्या महालांना, हवेल्यांना इस्लामी शिल्पकलेनुसार नक्षी-कलाकुसर, वाकदार कमानी उभारल्या. त्यांना घुमटाकार दिल्या जाऊ लागला. राज्यकर्त्यांच्या केशभूषेचे, वेषभूषेचे अनुकरण व्हायला लागले. घरात गोषा आला. काहींनी फारसी-अरबी-उर्दूचा अभ्यास करून हेजिब-वकील होऊन राज्यकर्त्यांची कृपा-मर्जी संपादिली.

जेत्यांच्या संस्कृतीचे संतुष्टीकरण करण्याच्या हेतूने इष्टलिंग ठेवण्यासाठी जी कुपी वा लिंगाकार (निंबू/शिवलिंग/बेल/देवघर) असतो, त्या बाह्याकाराला घुमट-मिनारांचा भास होईल अशी किमया धातुशास्त्रातील कारागिरांनी केली. यामागे राज्यकर्त्यांच्या धार्मिक अहंकाराला तोषवून, खुलवून त्याआडून अहिंसक मार्गाने स्वधर्माचे रक्षण करण्याचा त्यामागे हेतू असावा. हे प्रमाण सार्वत्रिक नसून अल्प होते. परंतु ह्या गोष्टींवरून वीरशैवांना कसकशा दिव्यातून जावे लागत होते याची प्रचीती येऊ शकते.

मराठे : आशेचा किरण
दक्षिणेत अजून तग धरून राहिलेली राज्ये म्हणजे मदुराईचे पांड्य, चेर, कारवार-गोव्याचे कदंब, तुंगभद्रेकाठचे विजयनगर व कोल्हापूरचे शिलाहार. ही राज्ये गिळंकृत करण्याची आसुरी लालसा सुलतानांना होतीच. ती बळकाविण्यासाठी दक्षिणेतील कन्नड-तेलुगू लोकांवर विजय मिळविण्यासाठी, ‘कन्नड-तेलुगू’ लोक सोडून इतर लोक सुलतानांना पाहिजे होते. त्यांची नेमणूक सैन्यात, राज्यकारभारात, प्रशासनात करावयाची होती. म्हणून बहामनी सुलतानांनी मराठे लोकांना हाताशी धरले. पाचही सुलतानांच्या दरबारी आता मराठ्यांची बडदास्त होऊ लागली. त्यांना मनसबी, वतने, तनखे, जहागिरी, देशमुखी, पाटीलकीची वतने खूष करण्यासाठी वाटल्या गेली. शस्त्रे, युद्धसामुग्री व अधिकार देऊन युद्धाचे डावपेच शिकविल्या जाऊ लागले. मराठ्यांचा विजयवारू चौखूर उधळू लागला. अशा राजकीय गदारोळात आजच्या दक्षिण महाराष्ट्रातील वीरशैव संभ्रमित झाले, गोंधळून गेले.

वीरशैवांना आपला धर्म, जीवित, वित्त व अब्रूच्या रक्षणासाठी आता कुणाकडे जावे हा संभ्रम पडला होता. प्राप्त परिस्थितीत सुलतानांपासून रक्षण करू शकणारे फक्त मराठेच दिसत होते. म्हणून मराठा सरदारांकडे व वतनदारांकडे आशेने, आस्थेने अधिनायक म्हणून पाहू लागले. परिस्थितीवश कन्नडभाषकांच्या मनात हळूहळू मराठी भाषासंस्कृतीविषयी आकर्षण वाटायला लागून चौदा-पंधराव्या शतकात स्वत:चे मराठीकरण करवून घ्यायला प्रारंभ केला. काही काळ घरात कन्नड, बाहेर मराठी, कालांतराने दोन्हीकडे मराठी अशी स्थिती दक्षिण महाराष्ट्रातील गाभाप्रदेशात, लाटांच्या प्रदेशात निर्माण झाली. असे होता होता, पंधरावे शतक संपायला येत होते. मोरे, माने, मोहिते, घाटगे, घोरपडे, सावंत, शिर्के, जाधव, भोसले, नाईक, निंबाळकर इ० मराठे सुलतानांच्या जवळचे राज्यकर्ते म्हणून तयार झालेले होते. याच शतकात भोसले मालोजी, शहाजीचे कर्तृत्व सुरू झालेले होते. पुढे छत्रपती शिवरायांच्या रूपाने मोठा आधारवड त्यांना लाभला. सुलतानशाहीपासून मराठेच सुरक्षितता देऊ शकतात या भावनेतून वीरशैव-लिंगायतांचा कन्नड पीळ व परिवेष कमी कमी होत जाऊन मराठमोळ्या संस्कृतीविषयीची श्रद्धा व आदर उत्तरोत्तर वाढू लागला. ‘मराठी’ विजिगीषू पराक्रमी राज्यकर्त्यांची भाषा ठरू लागली. वीरशैवांना आता मराठी भाषा स्वीकारणे ही काळाची गरज वाटू लागली.
दक्षिण महाराष्ट्रातील मूळ भूमिपुत्र असलेल्या कन्नड वीरशैवांच्या अवती-भवती आता मराठीचा बोलबाला होत होता. मराठ्यांच्या शस्त्रांच्या, सैन्यशक्तीच्या जोरावर सुलतानी शहा आपआपल्या सिंहासनावर निश्‍चिंत होते. पराक्रमी मराठ्यांच्या शब्दाला सुलतानाच्या दरबारात किंमत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात (१६३०-१६८०) मराठी भाषासंस्कृती शिखरावर होती. जेत्यांचे सारेच अनुकरणीय ठरते. आता कन्नडला दुय्यम स्थान प्राप्त होत होते. कन्नडभाषक म्हणजे राज्यकर्त्यांशी संबंध नसलेला, खेड्यापाड्यात राहून शेती, व्यापार, दुकानदारी करणारा अडाणी अल्पसंख्य, अशी काहीशी उपेक्षित दृष्टी वीरशैवांकडे पाहण्याची मराठी भाषकांत निर्माण झाली. ही उपेक्षा व न्यूनगंड नष्ट व्हावा, समाजजीवनात हिरिरीने भाग घेता यावे, उल्हासितपणे मिसळता यावे यासाठी वीरशैव-लिंगायतांनी स्वत:च्या मर्‍हाटीकरणास वेगाने प्रारंभ केला.

काही वीरशैवांनी शिवकाळात मराठ्यांशी जुळवून घेऊन मुलकी प्रशासनकार्य सांभाळल्याचे आडनावांच्या इतिहासावरून लक्षात येते. जहागिरदार, देशमुख, देसाई, सिंहासने, चौगुले, पाटील, खोत, महाजन, शेट्टी (शेटे), बिराजदार (वतनदारांचे किल्ले, गढ्या, वाडे यांचे रक्षणकर्ते), नाईक, कुळकर्णी (महसुली कार्य), हुंडेकरी, सोनटक्के, होनराव (चलनव्यवहार करणारे), सुंकीये, संकाये (वाहतूक करवसुली करणारे), कोठीवाले, कोठावळे (दारुगोळा धान्य सांभाळणारे), मोकाशी (तात्पुरती जहागिरी) इत्यादी.

वरील आडनावांवरून लक्षात येते की काही वीरवृत्तीचे वीरशैव बांधव मराठी समाजजीवनाशी समरस होत होते. सोळाव्या शतकापासून आता मठाधिकारी, स्वामी, जंगम यांना संस्थापित वीरशैवांच्या पुढील पिढ्यांना वीरशैव साहित्य मराठीतून देण्यासाठी तळमळ लागलेली दिसून येते.

सोळावे शतक : वीरशैव मराठी साहित्याचा उष:काल
वीरशैवांना धर्माचरण कळावे, पंच जगद्गुरूंची, त्यांच्या क्षेत्राची माहिती व्हावी, म० बसवेश्‍वर, अल्लमप्रभू, सिद्धरामेश्‍वर इ० प्रमथगणांची, संत-शरणांची जीवनगाथा कळावी, तत्त्वज्ञान-आचारधर्म कळावा, सांप्रदायिक वैशिष्ट्य कळावे, धार्मिक सुसंस्कार व्हावे, इतर धर्मपंथाच्या आकर्षणाला बळी पडू नये यासाठी वीरशैव मराठी साहित्याची उत्कटपणे आवश्यकता वाटायला लागलेली दिसते. शिखरशिंगणापूरच्या शांतलिंगस्वामींनी पश्‍चिम महाराष्ट्रात आणि कपिलधारच्या मन्मथस्वामींनी मराठवाड्यात इष्टलिंगभक्तीचा जागर केला. शिवभक्तीचा शंख फुंकून निद्रिस्त वीरशैवांना खडबडून जागे करीत ते म्हणाले:-

निजू नका जागा जागा । आपुल्या स्वधर्माने वागा
सदा भस्म लावा भाळी । लिंगपूजा बिल्वदळी

... सांडोनी शिवाते दुजियाते ध्याती । त्यांचे तोंडी माती जन्मोजन्मी

अशा तर्‍हेची जाज्वल्य इष्टलिंगभक्ती शिकवून वीरशैवांची सुप्त अस्मिता व अभिनिवेश जागी केली. अशा तर्‍हेने सोळावे शतक वीरशैव मराठी साहित्याचा रम्य उष:काल आहे.
सोळाव्या शतकापासून प्रारंभ झालेली वीरशैव वाङ्मयसरिता आज एकविसाव्या शतकापर्यंत चांगली सौष्ठवपूर्ण झालेली आहे. वीरशैव वाङ्मय विविध वाङ्मयप्रकारांनी समृद्ध झालेले आहे. त्यात काय नाही? गद्य-पद्य चरित्रे, ओवीग्रंथ, अभंगवाङ्मय, आख्यानकाव्ये, तीर्थमालिका, स्तोत्रे, काव्यसंग्रह, संगीतिका, स्फुट काव्यात पदे, स्तोत्रे, आरत्या, भूपाळ्या, अष्टके, पाळणा, गीते, कटाव, इ० प्रकार आहेत.
लोकसाहित्यात भारूडे, गबाळ, वडप (गुग्गुळ) किंवा खापरी गीते, डफगाणी, पोवाडे इ० आहेत. ललित लेखनात नाटके, एकांकिका, गीतिकाव्ये, कथा, चरित्रे यांवरही लेखन झालेले आहे व होत आहे. वीरशैव मराठी वाङ्मयात संपादने, समीक्षा, प्रबंधलेखन, नियतकालिकांतून लेखन आजही होत आहे. वैविध्यपूर्ण वीरशैव मराठी साहित्याचे स्थूलमानाने तीन प्रकारांत वर्गीकरण करता येईल:-

१. कन्नड कलाकृतींच्या आधारे मराठीत अनुवादित साहित्य.
२. संस्कृत ग्रंथांच्या आधारे मराठीत अनुवादित साहित्य.
३. स्वतंत्र साहित्यकृतींची निर्मिती.

वीरशैवांच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास मात्र शांतलिंगस्वामींपासून सुरू करावा लागतो, हे मत मान्य करावे लागते (ढेरे १९७२, ४०). समीक्षकांच्या मते,  मन्मथस्वामी हे पहिले वीरशैव अभंगकार आहेत (पसारकर २००१, १९).

विदर्भातील वीरशैव
विदर्भाच्या सांस्कृतिक जडणघडणीत वीरशैवांचेही योगदान आहे. विदर्भातील वीरशैवांच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा म्हणजे साखरखेर्डा (जि० बुलडाणा) येथील श्रीपलसिद्ध बृहन्मठ. या मठाचे मूळपुरुष श्रीपलसिद्ध यांचा समाधिशक ९८० (इ०स० १०५८) असा आहे. सध्या मठाचे पट्टाध्यक्ष श्रीगुरू ष०ब्र० वेदान्ताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजी आहेत. संतकवी लक्ष्मण यांनी याच मठातून प्रेरणा घेऊन विपुल अभंगवाङ्मय निर्माण केलेले आहे.

चालुक्यकाळातील गणेशवाडी शिलालेख (इ०स० १०९९)
चालुक्य नृपती सहावा विक्रमादित्याच्या राज्यात विदर्भातील काही भागाच्या अंतर्भाव होत होता. विक्रमादित्याचा महाप्रधान भीमनाथ याने बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे भीमसमुद्र नावाचे सभागृह बांधले. ब्रह्मा-विष्णु-महेश यांची स्थापना करून पूजाअर्चेसाठी मेहकर जवळील ‘पिप्परिकखेड’ (मेहकरच्या नैर्ऋत्येकडील २५ कि०मी० वरील गाव) दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे (कोलते १९६९, ३६-८०). या शिलालेखातील तिसर्‍या भागास ‘शिवलिंगी संतान आचार्य’ असे नाव दिलेले आहे. ही शिवलिंगी संतान आचार्यांची परंपरा वीरशैवच होय. यात पुढे लकुलीश्‍वराचा उल्लेख आहे. लकुलीश हा पाशपुत संप्रदायाचा मूळपुरुष होय. पाशुपत संप्रदाय पूर्णपणे वीरशैवांत विलीन झालेला आहे. आजचा दक्षिण महाराष्ट्र आणि गोदावरीच्या खोर्‍यातील वीरशैव- त्यात मराठवाडाही आलाच- हे तेथील मूळ निवासी भूमिपुत्रच आहेत. ते इतर ठिकाणाहून किंवा कर्नाटकातून स्थलांतरित झालेले नाहीत.

राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष नृपतुंग (इ०स० ८१५ ते ८७७) या राज्याच्या कारकिर्दीतील दरबारी कवी श्रीविजय याने ‘कविराजमार्ग’ या प्राचीन हळेगन्नड ग्रंथात म्हटले आहे की, कन्नड भाषा व संस्कृती कावेरीपासून गोदावरीपर्यंत पसरलेली आहे (लोकापूर १९९४, ९).

कल्याणक्रांतीचा परिणाम (११६७)
बाराव्या शतकात म० बसवेश्‍वरांनी कल्याण (जि० बिदर) परिसरात जातिनिर्मूलनाचे प्रखर आंदोलन केले व त्याला कर्मठांनी विरोध केला. राजाने सनातनी लोकांची बाजू घेऊन दोन भिन्न जातींत विवाह लावून देण्याचे निमित्त होऊन राजा बिज्जलाने वरवधूंच्या वडलांना हत्तीच्या पायी देऊन क्रूरपणे ठार केले. या घटनेमुळे चालुक्यांच्या राज्यात बसवानुयायी इष्टलिंगधारी लिंगायत व राज्याचे सनातनी सैनिक यांच्यात गृहयुद्ध झाले. यात वीरशैवांनी मोठ्या प्रमाणात जीव-वित्ताच्या संरक्षणार्थ चहुदिशांनी स्थलांतर केले. कल्याण आज आंध्र-कर्नाटक-महाराष्ट्र या तिन्ही राज्यांच्या सीमेवर आहे. कल्याणक्रांतीमुळे (११६७) तीनही प्रदेशांत मध्यवर्ती वीरशैवांचे स्थलांतर झाले. त्यातील काही लोक वेगवेगळ्या मार्गाने विदर्भात आले. येताना सोबत आपले धनवित्ताबरोबर विचारधन, इष्टलिंगसंस्कार हेही घेऊन आले.

देवगिरीच्या यादवसाम्राज्यावर १२९६ साली दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केली. दक्षिणेतील देशी राज्ये एकेक करून धुळीस मिळविणे सुरू केले. १३२७ ला महंमद तुघलकाने दिल्लीची राजधानी देवगिरीला आणली. बहामनीच्या दक्खनच्या राज्याच्या पाच शाह्या निर्माण झाल्या. अहमदनगर, बिदर, विजापूर, गोवळकोंडा (हैद्रबाद) व अचलपूर या नव्या सुलतानांच्या राजधान्या झाल्या. चौदाव्या शतकात चौदाशे सूफी संतांनी इस्लामचा धर्मप्रसार खुलताबाद व दौलताबाद येथून सुरू केला. १६५३ ला औरंगजेब औरंगाबादला मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठाण मांडून बसला. १७२४ ला दौलताबादचे औरंगजेबाचे राज्य हैदराबादच्या निजामाने बळकाविले.

या सर्व धामधुमीत स्थानिक प्रजेला अभय देणारा दक्खनी देशी राजा सोळाव्या शतकापर्यंत कोणीही नव्हता. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (१६३०-१६८०) रूपाने प्रजेला त्राता मिळाला. परंतु चौदाव्या ते सोळाव्या शतकांपर्यंतचा सुमारे ३०० वर्षांचा काळ धामधूम, लुटालूट, पळापळी-पळवापळवी यातच गेला. प्रजेच्या मनात रात्री-बेरात्री धाकधूक असायची. जीवनवित्ताची स्त्रियांच्या बेअबूची सतत चिंता असायची. याशिवाय चौदाव्या शतकात दक्षिण महाराष्ट्रात सतत १२ वर्षे भयंकर दुष्काळात गेली. त्यात देवीचा प्रकोप, यांमुळे प्रजा हवालदिल झाली. म्हणून या कालखंडात वीरशैवांनी माठ्या प्रमाणात गाभाक्षेत्रापासून, लाटांच्या क्षेत्रापासून दूर अन्यत्र सुरक्षित ठिकाणी वेगवेगळ्या काळात स्थलांतर केलेले आहे.
स्थलांतरितांना व्यापाराशिवाय गत्यंतर नसते.

राजकीय राज्यक्रांती, नैसर्गिक प्रकोप वा अन्य कारणांवरून मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक स्थलांतर करतात तेव्हा त्यांना पोट भरण्यासाठी व्यापाराशिवाय गत्यंतर नसते. अपरिचित, अनोळखी असल्यामुळे, राजकीय मान्यवरांशी ओळख नसल्यामुळे राज्ययंत्रणेतील नोकर्‍या मिळवू शकत नाहीत. शेती ताबडतोब घेऊ शकत नाहीत. केवळ व्यापाराशिवाय गत्यंतर नसते. व्यापारात स्थानिकांच्या तुटक्या-फुटक्या बोलीभाषेने काम भागते. मध्ययुगीन काळात धान्य, कापड, किराणा-भुसार मालाशिवाय इतर कोणताही व्यापार नव्हता.
विदर्भातील स्थलांतरितांनी वैश्यवृत्ती स्वीकारून व्यापार सुरू केला. असे हे विदर्भातील वणिक ‘वाणी’ झाले. पाकिस्तानातील सीमावर्ती सिंध प्रांतातून मोठ्या प्रमाणात सिंधी लोकांनी १९४७ ला स्थलांतर केले. त्यांनाही प्रारंभी व्यापाराशिवाय गत्यंतर नव्हते. विदर्भातील जे वीरशैव स्थलांतर करून आले, त्यांची प्रारंभीची भाषा एकतर तेलुगू किंवा कन्नड असावी. त्यानंतर त्यांनी मराठी भाषासंस्कृतीत स्वत:ला विरघळवून घेतले. समरस झाले. आडनावांच्या इतिहासावरून या घटनेचा बोध घेता येतो. याशिवाय यशस्वी व्यापार करण्यासाठी मालकाची भाषा व स्थानिक लोकांची भाषा वेगवेगळी असेल तर व्यापारात अधिक यश मिळविले जाते, असा यशस्वी व्यापाराचा अनुभव आहे. म्हणजे विदर्भात वेगळी भाषा घेऊन आलेल्या लिंगायतांनी वर्‍हाडाच्या गोंडवनाच्या झाडीपट्टीतील प्रत्येक गावोगावी जाऊन स्वत:चा व्यापार सुरू करून उत्तम व्यावसायिक यश मिळविले. मराठवाडा भागातील लिंगायतांचे समूह गटागटाने गोदावरीच्या उत्तरेकडील विदर्भात बुलडाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती, छिंदवाडा या भागात आणि या भागाच्या गामीण भागांत प्रवेश करते झाले.
तेलंगणा-आंध्र भागांतील मुख्य राजघराणे म्हणजे वरंगळचे. काकतीय नृपती. गोदावरी-कृष्णा नद्यांच्या प्रदेशातील हे राज्य. या राजघराण्याला वीरशैव संप्रदायाप्रती आस्था होती. हे प्रथम चालुक्यांचे मांडलिक राजे होते. या राजघराण्यातील ‘प्रतापरुद्र प्रथम, काकतीय’ (मृत्यू ११९९) यांच्या दरबारात ‘पालकुरिके सोमनाथ’ हा राजकवी होता. सोमनाथ संस्कृत-तेलुगू -कन्नड भाषेचा पंडित होता. यानेच मंगळवेढा-कल्याण परिसरात महात्मा बसवेश्‍वरांच्या मानवतावादी कार्याचा गौरव करण्यासाठी म० बसवेश्‍वरांचे चरित्र ‘बसवपुराण’ सर्वप्रथम तेलुगू भाषेत बाराव्या शतकात रचले (नाहर १९७६, ६२५). याशिवाय तेलंगणा हा तेलुगूभाषक भाग कल्याणच्या गाभाप्रदेशापासून जवळच असल्यामुळे आंध्रप्रदेशातही इष्टलिंगभक्ती करणार्‍या वीरशैवांची संख्या पुष्कळच आहे. वरंगळचे राज्यही सुलतानांच्या बळी पडले. हैदराबादच्या निझामाचा त्रास होऊ लागला म्हणून तेलंगणातून वीरशैवांचे समूह चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर या भागांत व ग्रामीण भागात स्थलांतरित झाले.

आडनावांची अर्थगर्भता
विदर्भात स्थलांतर केलेल्या वीरशैव-लिंगायतांच्या आडनावांचा विचार केला तर त्यावरून त्यांच्या पूर्वजांचा व्यवसाय, मूलस्थान आदी बाबींचा बोध होतो. काही लिंगायत गाढव-घोडे-खेचरांच्या पाठीवर एकच माल लादून व्यापार करीत. म्हणून असे लोक केवळ त्या वस्तूंच्या नावानेच ओळखले जाऊ लागले.

व्यवसायबोधक आडनावे : बाजारे, कबाडे, साखरे, साखरकर, गुळवे, बिडवे, गुळकरी, मिठारे, मिठकरी, फुटाणे, हिंगमिरे, गुळमिरे, कस्तुरे, साखरपोहे, तंबाखे, चणेवार, वाटाणे, खोबरे, तांधळे, गव्हाणे, जिरगे, हळदकेरी, तेले, फल्ले, साबणे, शेंदरे, भांगे, आवळकंठे, नाडपुडे, उदपुडी, लवंगे, कथले, लोखंडे, लोहारे, लोहारकर, तांबोळी, कंठाळे, घोंगडे, गंगावनवाले, देवांग (रेशमी वस्त्र), सट्टे, हुंडेकर, हवाले, होनराव, सोनटक्के, रुक्कारी.
कृषि-उत्पन्न व्यवसाय करणारी आडनावे : वाळके, आलेराव, आ लेकर, झाडे, सांभारे, गांजरे, पिंपळे, उंबरे, चाकोते, भोपळे, निंबाणे, डांगोरे, डांगरे, कापसे, कापुसकरी, बोरकर, नारिंगे, केळकर, खोडदे, हिवरे, कवठाळे (कोठावळे), जांभळे, गजरे, फुलारी, ढोले, लाकडे, बेलपत्रे इत्यादी.

मध्ययुगीन वाहतुकीसाठी एकमेव स्वस्त उपयुक्त साधन म्हणजे गाढव. ज्यांच्याजवळ परमुलखात माल नेण्यासाठी खूप गाढवं आहेत तो झाला ‘गाढवे.’ गोदावरीपलीकडून दक्षिणेतून (उत्तर कर्नाटकातून) आलेल्या काही लिंगायतांनी आपल्या कन्नडमधील आडनावांचे मराठीकरण न होऊन देण्याची खबरदारी घेतली व आपले स्वत्व, प्रदेशाचा स्वाभिमान जपला. अशी आडनावे (ही यादी संपूर्ण नाही):-

आडके, आडकी (सुपारी); औटी, आवटी, आवटे, आवते (विशिष्ट मापाने मोजणारे); कोरी (जुने कापड विकणारे); हत्ती, हत्तरगी (कापूसव्यवसाय करणारे); मडकी (मटकी); जम्मा (वसुली करणारे); बोंदरीगे, बोंगरगे (गादी-लोड-तक्क्या तयार करणारे); भंगारी (भंगार-सोने); वाले (ताडपत्रीचा व्यवसाय); बोंते (वाकळ-गोधडी); मेणसे, मेंडसे, मेणसीनई (मिरची); तनमने (माझे घर) इत्यादी.

वीरशैव लोक ज्या मूळच्या गावावरून विदर्भात आले त्या गावांचा त्यांनी आडनावासाठी उपयोग केला. उदा.- बोधनकर, भागानगरकर (हैदराबाद), धारवाडकर, बेदरकर (बिदर), विजापूरकर, धर्माबादकर, हुमनाबादकर, कल्याणकर, कल्याणशेट्टी.

ऐतिहासिक वीरशैव घराणी
मध्ययुगीन काळात काकतीय, केळदी, कुर्ग, कित्तुर, बिळगी, स्वादी या राजघराण्यांनी यवनांशी लढत दिली. प्रजाजनांची सेवा केली. याला इष्टलिंगभक्तीचा आधार होता. पोर्तुगीज, डच, इंग्रज यांची आक्रमणे परतवून जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा व धर्माभिमानाचा प्रत्यय आणून दिला. यात बिदनूरचे केळदी, बेलवडी, कित्तूर-निपाणीचे निपाणकर, सिंहासने या घराण्यांचे मोलाचे योगदान आहे. विदर्भात ज्या राजघराण्याचे धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत मोलाचे योगदान आहे, नि:स्पृहपणे निरपेक्ष लोकसेवा करण्याचा वारसा ज्या वीरशैव-लिंगायत राजघराण्यांकडे परंपरेने चालत आलेला आहे असे विदर्भातील एकमेव राजघराणे म्हणजे ‘पारवेकर-देशमुख घराणे’ होय.

पारवेकर-देशमुख घराणे 
हे विदर्भातील एकमेव ऐतिहासिक लिंगायत घराणे होय. या घराण्याला दिल्लीच्या औरंगजेब बादशहाचे एक व त्याच्या मोंगली वजीराचे पाच अशा एकूण सहा फारसी सनदा मिळालेल्या आहेत. इ०स० १६६७ च्या सुमारास म्हणजे शिवकाळात गोंडवनाला लागून असलेल्या परगणे ‘येवत-लोहारा, सहकार, कळंब, परगणे, केळापूर व परगणे बोरी (पाटण)’ या भागाच्या देशमुखीचे व केळापूरच्या देशपांडेपणाच्या वजनाचे फर्मान दिलेले आहे. घराण्याचा मूळपुरुष ‘नागोजी बसवंतराय देशमुख यांच्याकडे कळंब इ० भागाचे वतन कदिमपासून चालत आलेले मी त्याच्याकडे कायम करतो’ असे सनदेत म्हटलेले आहे. त्यांच्या जहागिरीत ८ मजबूत गढ्या आहेत.
दुसर्‍या बाजीराव पेशव्याला पारवेकर देशमुखांनी त्याला आपल्या शिवणी येथील गढीत आश्रय दिला. दि. २.४.१८१८ ला शिवणी येथे झालेल्या युद्धात बाजीरावचा पराभव होऊन पेशवाई संपली. पारवेकर-देशमुख घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष होऊन गेले. धुपानजी, शंकरराव, यशवंतराव, दत्ताजी, माधोराव, नागोराव, आनंदराव, गणपतराव, बळवंतराव, कृष्णराव, दत्तात्रेय यांचे पुत्र म्हणजे त्र्यंबकराव ऊर्फ आबासाहेब देशमुख पारवेकर. मध्यप्रांतात वर्‍हाडच्या १९५२ च्या निवडणुकीत दत्तात्रेय ऊर्फ बाबासाहेब देशमुख पांढरकवडा येथून विधानसभेवर प्रथम निवडून गेले. १९५६ ला आबासाहेब देशमुख आमदार झाले. १९५७ च्या द्वैभाषिक मुंबई राज्यात आबासाहेब आमदार झाले. १९६७ ला ते पुन्हा आमदार झाले. ३ ऑक्टोबर १९६९ ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांची निवड झाली. १९७२, १९८० साली यवतमाळ विधानसभा मतदारसंघात ते विजयी झाले. त्यांचे चिरंजीव अण्णासाहेब देशमुख पारवेकर त्यांचा वारसा चालवीत आहेत. १९९० च्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून अण्णासाहेब यवतमाळचे आमदार झाले.

माहूरच्या दत्तात्रेय संस्थानला दरवर्षी या घराण्याकडून अन्नदान, भंडारा, नैवेद्य, नंदादीपासाठी ‘नागेझरी’ गाव दान दिलेला होता. पू० विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञात साडेतीन हजार एकर जमिनीचे दान केलेले आहे. पारवा भागात इंग्रजी शिक्षणाची सोय, दवाखान्याची सोय केली. पारव्याचा दहा दिवस चालेला गणेशोत्सव म्हणजे आसमंतातील एक धार्मिक, सांस्कृतिक मेजवानी होती. म० बसवेश्‍वरांचे भाचे चन्नबसवेश्‍वर यांनी लिहिलेला ‘करणहसुगे’ हा ग्रंथ मराठीत सोळाव्या शतकात शांतलिंगस्वामींनी आणला. हा ग्रंथ श्रीमती धर्मनिष्ठ सरस्वतीबाई देशमुख, पारवा जहागीर (निधन १९४५) हिचे स्मरणार्थ दत्तात्रेय कृष्ण ऊर्फ बाबासाहेब देशमुख, जहागिरदार यांनी ८.१२.१९४६ रोजी प्रकाशित केलेला आहे.

विदर्भातील वीरशैव मठसंस्था, शिवालये व शिवशिल्पे
साखरखेर्डा येथील श्रीपलसिद्ध बृहन्मठ : साखरखेर्डा (ता० सिंदखेड राजा, जि० बुलडाणा) येथील श्रीपलसिद्ध बृहन्मठ अत्यंत प्राचीन आहे. मठाचे बांधकाम अनेक शतकांपूर्वीचे आहे, हे मठ पाहताक्षणीच लक्षात येते. मूळ मठ हा अत्यंत अभेद्य, श्‍वापदांपासून सुरक्षित राहावा असा बांधलेला असून त्यापुढे दोन टप्प्यांत मठाच्या बांधकामाचा विस्तार झालेला दिसतो. मूळ मठाचे द्वार भुयारी मार्गासारखे असून त्यातून पुढे गेल्यावर आतील भव्य, प्राचीन मठ दृष्टीस पडतो. इसवी सनाच्या ११ व्या शतकात पलसिद्ध महाराजांनी येथील अरण्यात- खेटकवनात- पळसाच्या वृक्षाखाली वास्तव्य केले, अशी कथा आहे. त्यांनी शके ९८० (इ०स० १०५८) मध्ये संजीवन-समाधी घेतली. त्यांच्या सिद्धलिंग नामक शिष्याने आपल्या सद्गुरूंच्या पादुका स्थापन करून मूळ मठ बांधला. त्यानंतर पुढील काही शतकांत मठाचा विस्तार होत गेला. मठात जेथे पलसिद्धांची मूर्ती स्थापन केलेली आहे त्या मंदिराचे दार चांदीने मढविलेले असून त्याच्या वरच्या भागावर ‘श्रीमद्जगद्गुरुपरमहंसमरुळाचार्यवर्यश्रीमद्भूरुद्रपळसिद्धस्वामिन्प्रसिदश्रीमन्नृपशा. शके ९८०’ असा मजकूर कोरलेला आहे.  दुर्दैवाने १०० वर्षांपूर्वी मठातील प्रचंड ग्रंथसंपदेचा लगदा करून एका अडाणी कलावंताने त्यापासून पुतळे बनविले. ते केव्हाच फुटून गेले.

दारव्हा येथील प्राचीन मठ : वीरशैवांचा मुख्य मठ पूर्वी दारव्हा (जि० यवतमाळ) गावाचे बाहेर यवतमाळ रोडवर सिद्धेश्‍वर-मंदिरातच होता. हे मंदिर व मठ इ०स० १६५० मध्ये औरंगजेब बादशहाने जातीने उभे राहून पाडले व सिद्धेश्‍वराचे मंदिरही उद्ध्वस्त केले. जेथे हा मठ व मंदिर होते तेथेच हल्ली खासबागेत काळ्या पाषाणाची थडगी दिसतात. बहुधा ते दगड ह्या मंदिराचेच असण्याचा संभव आहे. हे हेमाडपंती स्वरूपाचे पण विशेष शोभिवंत असे गावातील प्रमुख महादेवाचे मंदिर होते, असे समजते. सध्या ही वर्णन केलेली जागा मिर्झा कुटुंबियांच्या मालकीची दिसते. मंदिराचे अवशेष आहेत. तिचे पीर, मजारीत परिवर्तन झाले आहे.
दारव्हा येथील मठ उद्ध्वस्त केल्यामुळे दारव्ह्याचा प्रमुख मठ जवळच असलेल्या तळेगावी तत्कालीन रजपूत-देशमुखांच्या आश्रयाने नेण्यात आला. पुढे तळेगावचे देशमुखही मुसलमान झाले, तरी त्यांचा आश्रम  व संरक्षण मठास कायम आहे.

दारव्हा येथील पहिले पुरुष गंगाधरस्वामी इ०स०च्या १०-११ व्या शतकात होते. या मठाच्या तळेगाव, कारंजा (लाड), चिंचगाव, जळका (ता. चांदूर) येथेही शाखा आहेत. इ०स० १६०० ते १७०० च्या दरम्यान कोडलिंग स्वामी  शिवलिंग स्वामी  वीरलिंग स्वामी अशी गुरुपरंपरा होती. दारव्हा येथील मठ व समाथ्या १० मैलावरील तळेगावला नेऊन बांधण्यात आल्या. आज तेथे मठ व समाध्या आहेत व गुरुपरंपराही कायम आहे.
विदर्भस्थ द्वारावती (दारव्हा) : ‘विदर्भस्थ द्वारावतीमाहात्म्य’ नामक एक ग्रंथ उज्जयिनी येथील महाकालेश्‍वराच्या मंदिरात सापडला. तो हस्तलिखितात होता. ज्या विदर्भनगरीस द्वारावती असे नाव मिळाले विदर्भनगरीच्या शिवभक्तीसंबंधीच्या अनेक कथा ‘शिवलीलामृत’ या ग्रंथात आलेल्या आहेत. विदर्भ राजाने द्वारावती (दारव्हा) येथे बांधलेली दोन प्राचीन शिवमंदिरे सध्याही आहेत. पहिले मल्लिकार्जुन मंदिर. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार तेथील वीरशैवांनी केला आहे. दुसरे उत्तरेश्‍वर प्राचीन मंदिर अल्लाउद्दीनाने उद्ध्वस्त केलेल्या स्थितीतच आहे. सोळा सोमवारच्या कथेतील प्राचीन पोथीत पहिली ओवी अशी आहे:-

विदर्भ देशी परमपवित्र । द्वारावती मुख्य नगर।
तेथे शिवालय महाथोर । जे का अपूर्व त्रिभुवनी ॥१॥
परंतु १५ ऑगस्ट १९७४ ला मुंबईचे प्रकाशक र०ग० रायकर यांनी मुंबई वैभवप्रेसमध्ये छापलेल्या सोळा सोमवारच्या कथेत, राघव व्यंकटेश साचार यांनी ‘द्वारावती’ शब्द काढून त्या जागी ‘अमरावती’ असा नवा शब्द घातला. वा० कृ० दाणी म्हणतात, ‘सोळा सोमवारची कथा द्वारावती ऊर्फ दारव्हा येथील प्राचीन उत्तरेश्‍वर मंदिरातच घडलेली आहे. व्यासांच्या काळात अमरावती नव्हतीच. मूळ कथा ‘विदर्भस्थ द्वारावतीमाहात्म्य’ ह्या ग्रंथात उल्लेखित आहे. ती स्कंदपुराणातून घेतली आहे. यामुळे दारव्हा येथील वीरशैव मठाचे प्राचीनत्व स्पष्ट होते.’

नेरपिंगळाई मठ (जि० अमरावती) : अमरावती जिल्ह्यात नेरपिंपळाई येथे प्राचीन चिरेबंदी मठ आहे. त्या मठाचे ‘बसवप्रभू’ हे मूळ पुरुष आहेत. बसवप्रभूंचा काळ इ०स० ९६३ असे काही सांगतात, तर शिवचंद्र माणूरकर बारावे शतक सांगतात. हा मठ उज्जयिनी पीठांतर्गत येतो. येथील भोसल्यांच्या काळात मठावर ‘गंगाधरस्वामी’ हे शिवयोगी मठाधिपती होती. त्यांचा श्री. भोसले राजांकडून चांगला  मानसन्मान होऊन मठाला ७ हत्ती प्रदान करून बिदागिरी केलेली होती. म्याना, पालखी, हत्ती अंतोर्‍याच्या जंगलात सोडून दिल्याचे सांगतात. इ०स० १९६० मध्ये मठाला आग लागली. परंतु गंगाधरस्वामींच्या समाधीस व कपड्यास आग न लागता ते जसेच्या तसेच राहिले. एवढी जाज्वल्यता या समाधीस असल्याचे माणूरकरांनी लिहिले आहे.
वाशीम  येथील चिंतामणेश्‍वर मठ : वाशीम येथील चिंतामणेश्‍वर मठही प्राचीन आहे. येथील मंदिरात डॉ० शे० दे० पसारकर यांना श्रीमन्मथ शिवलिंगकृत ‘परमरहस्य’ हा हस्तलिखित ग्रंथ सापडला. ‘तिमसेट गाडवे’ यांनी शके १७१७ ,म्हणजे इ०स० १७९५ मध्ये ‘परमरहस्य’ ग्रंथाची ही प्रत तयार केली. वैदर्भीय वीरशैवांचा दुर्मिळ ग्रंथसंकलनाचा छंद मराठी साहित्याच्या दृष्टीने मौलिक कार्य म्हणावे लागेल. यातून वीरशैव वाङ्मयाबद्दलची जाज्वल्य निष्ठा व सांप्रदायिक श्रद्धा व्यक्त होते.

बाळापूर (जि० अकोला) वीरशैव मठ : बाळापूर मठसंस्थान ८०० वर्षांपूर्वीचे आहे. येथे १२ सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. या मठाचे मूळपुरुष ‘दमाय्या स्वामी’ होते. त्यांनी जिवंत समाधी घेतली होती. येथील गादीवर बसणार्‍या स्वामीस ‘पंचाक्षरी महाराज’ हे नाव धारण करावे लागते. त्यांच्या नागपूर, खापा, लाखाड, पातूर इ० गावी शाखा आहेत. बाराव्या शतकातील क्रांतीनंतर कल्याणातील शिवशरण ठिकठिकाणी गेले. त्यावेळी दमाय्या स्वामी महाराष्ट्रात येऊन बाळापूरला वास्तव्य करू लागले.

वीरभद्राचे देवालय : वीरशैव संस्कृतीत ‘वीरभद्र’ हे एक धर्मरक्षक दैवत आहे. अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील ‘शिवपूर’ गावाजवळील ‘कासोद’च्या डोंगरावर वीरभद्राची साडेचार फूट उंचीची प्राचीन मूर्ती आहे. तिची पूजाअर्चा जंगम गुरूच करीत आले आहेत. अद्यापही ही परंपरा चालू आहे. हे जागृत दैवत दिवसातून नऊ रूपे बदलत असल्याचे भाविक सांगतात. महाशिवरात्रीस व कार्तिक पौर्णिमेनंतर  नागदिवाळीला दोन मोठ्या यात्रा भरतात. मोठ्या प्रमाणावर विदर्भातील वीरशैव या यात्रेस गर्दी करतात.

प्राचीन शिवशिल्पे : शंभर वर्षांपूर्वी कळंब (जि० यवतमाळ) येथे पार्वतीची मूर्ती सापडली होती. मनसळ (ता० रामटेक, जि० नागपूर) येथे वाकाटककालीन ‘बटूक भैरव शिव’ मूर्ती सापडली आहे. मूर्तिविज्ञानशास्त्रज्ञ विजय वेरुळकर म्हणतात, ‘शिवाबरोबर विष्णूने स्त्रीरूप धारण करून फिरत राहण्याची कथा कूर्मपुराणात आहे. दक्षिण-भारतीय परंपरेप्रमाणे शिवमोहिनीच्या संयोगाने जो पुत्र उत्पन्न झाला तो‘आर्यभट्यनार’ किंवा ‘हरिहर’ होय. ...हरिहराची कळंबसारखीच सुरेख, काळ्या चकाकदार पाषाणातील शिल्पप्रतिमा ‘सिंदखेडराजा’ (जि० बुलडाणा) येथील नीलकंठेश्‍वराच्या मंदिरात दिसून येते. मे १९८५ च्या दरम्यान कळंब (जि० यवतमाळ) येथे सापडलेली हरिहरेश्‍वराची प्रतिमा अकराव्या शतकातील आहे. मूर्तीचे उजवे अंग शंकराचे आहे. त्या बाजूने नागांकित त्रिशूल, अक्षमाला, डमरू, पायाजवळ उपासक व शेजारी वाहन नंदी आहे. कमरेकडील भागाकडे नरमुंडमाळा तर बाजूला पार्वती उभी आहे.

संदर्भग्रंथ
१. कोलते वि० भि० १९६९ : विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक. नागपूर.
२. तोरो अ० रा०, (संपा०) २००१ : महाराष्ट्र-कर्नाटक सांस्कृतिक अनुबंध. प्रतिमा प्रकाशन, पुणे.
३. देशपांडे अ० ना० १९७३ : मराठी वाङ्मयाचा इतिहास, एकनाथपर्व, भाग तिसरा. व्हीनस प्रकाशन, पुणे.
४. नाहर रतिभानूसिंह १९७६ : प्राचीन भारत का राजनैतिक इतिहास. किताब महल, इलाहाबाद.
५. ढेरे रा० चिं० १९७२ : प्राचीन मराठीच्या नवधारा. मोघे प्रकाशन, कोल्हापूर.
६. पसारकर शे० दे० (संपा०) २००१ : श्रीलक्ष्मण गाथा. श्री सिद्धेश्‍वर प्रकाशन, आष्टी,
   जि० जालना.
७. लोकापूर रं० शा० १९९४ : ज्ञानेश्‍वरकालीन मराठी भाषेवर कन्नडचा प्रभाव.  निशांत प्रकाशन, बेळगाव.

***
विदर्भातील वीरशैव संप्रदाय : ग्रंथकार व वाङ्मय
प्रकाशक : शैवभारती शोधप्रतिष्ठान,
जंगमवाडी मठ, वाराणसी, २००५
या प्रबंधातील संपादित भाग.
***

No comments:

Post a Comment